परभणी: परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घराशेजारी राहते. आरोपींपैकी एक शिक्षक असून त्याने पीडितेचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून काढले. या व्हिडिओचा आधार घेत तिला वारंवार धमकावत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पीडितेचे बनावट फोटो तयार केले आणि तिला धमकावले.या प्रकरणात पोलिसांनी शिक्षकासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तिघांविरोधात बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) तसेच संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
विशेष पथकाची स्थापना
या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच तपास जलदगतीने पार पाडण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
कठोर कारवाई करण्याची मागणी
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांकडून होणाऱ्या अशा गुन्ह्यांची ही घटना राज्यात प्रथमच गंभीर स्वरूपात समोर आल्याचे मानले जात आहे. या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणामुळे तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणारे नवीन प्रकारचे धोके अधोरेखित झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल.