धुळे, 8 ऑगस्ट : देशातील महत्त्वाच्या शहरांवर दहशतवाद्यांची नजर असल्याच्या बातम्या आपण ऐकतो, वाचतो.. तपास यंत्रणा मॉक ड्रील करुन दहशतवाद्यांच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी चाचपणी करत असतात. मात्र असंच एक दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रील पोलिसांच्या अंगलट आलंय.
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. काही वेळातच शहरातून सायरन वाजवत पोलिसांची वाहने मंदिराजवळ पोहोचली. मंदिर परिसरात यावेळी एकच धावपळ उडाली. मंदिरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौघा भाविकांची सुखरूप सुटका केली.
advertisement
ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी स्वामीनारायण मंदिराच्या कॅन्टीन परिसरात काही जण कुटुंबीयांसोबत बसले होते. त्याचवेळी गोळीबाराच्या आवाजामुळे काही महिला आणि लहान मुलं प्रचंड घाबरली होती. त्यावेळी एका व्यक्तीने मॉकड्रीलमधल्या खोट्या दहशतवाद्याला पकडून चांगलाच चोप दिला, त्याच्या कानशिलातही लगावली. गोळीबाराच्या आवाजामुळे या व्यक्तीचं मुल रडायला लागलं, त्यातच हे मॉकड्रील असल्याचं लक्षात येताच ही व्यक्ती भडकली आणि त्याने मॉकड्रीलमधल्या खोट्या दहशतवाद्याच्या कानाखालीच लगावली. पोलिसांनी हे सगळं मॉक ड्रील असल्याचं सांगितलं आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.