या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मूळ चाळीसगावचा असलेला रूपेश पाटील आणि अवी पाटील यांचा या औषध तस्करीमागे हात आहे. दोघेही एमआर असून दोन वर्षांपूर्वी त्यांचं मेडिकल बंद पडलं होतं. आधीच्या ओळखीवर ते उत्तर प्रदेशमधून गुंगीची औषधं मागवत होते. काही माल स्थानिक विक्रेत्यांना देऊन उर्वरित नाशिक, मालेगावला पाठवत होते. दोघांपैकी एकजण वाळूजमध्ये माल घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच एएनसी पथकाने वाळूजमधील बड्या लॉजिस्टिक कंपनीवर शुक्रवारी छापा मारत चौघांना पकडलं. यात आरोपी भावांपैकी एकाचा समावेश आहे.
advertisement
एएनसीच्या पथकाला कंपनीच्या गोदामात 2504 बाटल्यांची 20 खोकी सापडली आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून एएनसी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी ही कारवाई केली. कारवाईबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. रात्री उशिरा पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त पंकज अतुलकर यांनी कारवाईचा आढावा घेतला.
या औषध तस्करीच्या माध्यमातून आरोपी मोठी आर्थिक कमाई करत होते. एका बाटलीची मूळ किंमत 175 आहे. तस्करांना ही बाटली 40 रुपयांमध्ये मिळत होती. दुसऱ्या साखळीतील पेडलर्सला ही बाटली 140 रुपयांना विकली जात होती. हे पेडलर्स नशेखोरांना एका बाटलीसाठी 400 ते 500 रुपये आकारत होते.