वित्त विभागाच्या मंजुरीनंतर प्रक्रिया सुरू
आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधीमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. महामंडळात चालक आणि वाहकांची मोठी कमतरता असल्याने हा भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. "सदर भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, तिथून हिरवा कंदील मिळताच भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल," असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
advertisement
५ हजार नवीन बस खरेदीचा संकल्प
एसटी महामंडळ सध्या तोट्यात असली तरी ती नफ्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महामंडळ दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करणार आहे. त्यापैकी ३ हजार वाहनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, टाटा मोटर्सला २१०० बस पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाड्यांची संख्या वाढत असल्याने कर्मचारीही तेवढ्याच प्रमाणात आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
२०२२ मधील संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी २,१२५ चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. आता होणाऱ्या कायमस्वरूपी महाभरतीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
