मध्य रेल्वेने 22229/22230 क्रमांकाच्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 25, 27 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसएमटीहून तर 26, 28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून धावेल. ही सुविधा केवळ गणेशोत्सवाच्या विशेष गर्दीच्या कालावधीसाठी असणार आहे, असं मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.
advertisement
बाप्पाच पावला! गणेशोत्सवानिमित्ताने 380 विशेष गाड्या, कुठे आणि कसं बुक करता येईल तिकीट?
जून 2023 मध्ये कोकण रेल्वे मार्गावरून व गोवा राज्यातून पहिल्यांदाच मडगावहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. प्रवाशांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही गाडी सातत्याने भरलेली असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी आता या गाडीचे डबे वाढवण्यात आले आहेत.
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारीकरणाचा अजून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत नेण्यात आली आहे. त्याचा रेक आणि प्राथमिक देखभाल व्यवस्था आता नांदेड येथे हलवण्यात आली आहे. मुंबईला याचा थेट फायदा झाला आहे. मुंबईतील पिटलाईन आता मोकळी झाल्याने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा 16 डब्यांचा रेक सहज सामावून घेता येणार आहे.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी कोकण विकास समितीकडून सातत्याने केली जात होती. शेवटी रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करून प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्त आणि कोकणवासीयांसाठी ही एक दिलासादायक बाब असून अधिक प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवास मिळेल, अशी अपेक्षा आहे.