मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत काही दिवसांपूर्वी एका वाघाचा मृत्यू झाला होता. वाघाचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. शक्ती नावाच्या वाघाचा 17 नोव्हेंबरला मृत्यू झाला. मात्र उद्यान प्रशासनाने ही बाब लपवली होती. मात्र त्याअगोदर रुद्रचा मृत्यू झाला आहे. रुद्रचा मृत्यू 29 ऑक्टोबरला झाल्याची माहिती आहे. रुद्र हा शक्ती वाघाचा बछडा होता.
advertisement
वाघांच्या मृत्युंचं कारण लपवलं जातंय का?
रुद्र हा काही दिवस आजारी असल्याची माहिती आहे मात्र मुख्य कारण अजूनही सामोर आलं नाही. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती राणी बागेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली नाही. वाघांच्या मृत्युंचं कारण लपवलं जातंय का असं प्रश्न निर्माण झालं आहे. राणीच्या बागेत एकूण शक्ती, जय, करिश्मा आणि रुद्र असे चार वाघ होते. त्यातील शक्ती वाघाचा मृत्यू झाला मात्र अद्याप रुद्र वाघ कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती, अखेर रुद्रच्या मृत्युच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या बछड्याचा मृत्यूची बातमी लपवल्याने प्राणीप्रेमी संतप्त
भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न केल्याने शंका उपस्थित होत असून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान दुसऱ्या बछड्याचा मृत्यूची बातमी लपवल्याने प्राणीप्रेमी संतप्त झाले आहे.
