नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विक्की चंदनशिव आणि आरोपी महेश चंदनशिव यांच्यात मुंबईतील एका रूमवरून गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता. ही रूम आपलीच आहे, असा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात होता. याच वादाचा राग मनात धरून महेशने विक्कीचा काटा काढण्याचा कट रचला. विक्की मंगळवारी (27 जानेवारी) मुंबईहून गावी आला होता, हीच संधी साधून महेशने शुक्रवारी रात्री त्याला आपल्या दुचाकीवर बसवून जेवणाच्या निमित्ताने बाहेर नेले.
advertisement
असा रचला खुनाचा कट
घटनेच्या रात्री सातच्या सुमारास "जेवण करून येतो" असे आईला सांगून विक्की घराबाहेर पडला. महेशने प्रथम विक्कीला दारू पाजली आणि त्यानंतर केवडजवळील एका ढाब्यावर नेऊन त्याला जेवू घातले. रात्री १० वाजेच्या सुमारास, विक्की नशेत असताना त्याला निर्जन अशा उत्तरेश्वर पिंप्री-केवड शीवरस्त्यावर नेले. तिथे महेशने आपल्याजवळील धारदार बतईने विक्कीच्या गळ्यावर वार केले. विक्कीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र जखम खोल असल्याने अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. पोलिसांना महेशवर संशय आला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी घटनास्थळी बोलावलं. यावेळी त्याची दुचाकी चकाचक धुतलेली होती. यावरून पोलिसांना संशय बळावला. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने दुचाकीवरील रक्त दिसू नये, म्हणून दुचाकी धुतल्याचं स्पष्ट झालं. यावरूनच पोलिसांनी आरोपी महेशला बेड्या ठोकल्या. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
