सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि बंदर विकास मंत्री आमदार नितेश राणे काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन रो-रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. आता प्रत्यक्षात सेवेला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त मुंबईत असलेले चाकरमानी कोकणात जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली आहे. स्थानिक विकास, पर्यटन आणि चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही सेवा वरदान ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
नितेश राणे म्हणाले, "आज विजयदुर्ग बंदरात बोटीची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास आणि सर्व यंत्रणांची पडताळणी समाधानकारक झाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात येईल. परतीच्या प्रवासात बोटीने चाकरमान्यांना थेट मुंबई गाठण्याचा मार्ग मोकळा होईल."
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पाच तासांचा प्रवास असेल. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 नॉट्स स्पीडच्या 'एम टू एम' नावाच्या रो-रो बोटीने नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. यामध्ये इकोनॉमी क्लासमध्ये 552 सीट, प्रिमीयम इकोनॉमीमध्ये 44, बिझनेसमध्ये 48, तर फर्स्ट क्लासमध्ये 12 सीट आहेत. या बोटीने चार चाकी आणि दुचाकी देखील वाहून नेल्या जाणार आहेत.
रो रो सेवेमुळे देवगड, मालवण, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी चांगला आणि जलद पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास बंदर प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. सध्या कोकणात पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेने 10 ते 11 तासांचा कालावधी लागतो. रस्ते मार्गे जाण्यासाठी 14 तासांहून अधिक वेळ लागतो.