पार्सल द्यायच्या कारणाने आलेल्या अज्ञात तरुणाने महिलेच्या गळ्यातील चेन खेचली आणि पळून गेला. नागपूर शहराच्या अंजनी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. पार्सल दिल्यानंतर महिलेला सही करण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्विनी मेश्राम असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी या प्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका महिलेच्या घरातील पत्त्यावर पर्सलसाठी सही घेण्यासाठी मेश्राम यांना घराबाहेर बोलावले. सुरुवातीला संशय न आल्यामुळे मेश्राम बाहेर आल्या. त्यावेळी आरोपीने त्यांना कागदावर काहीतरी वाचायला सांगितले आणि त्यांचे लक्ष विचलित केले. मेश्राम यांचे लक्ष कागदाकडे असतानाच, चोरट्याने मोठ्या चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि लगेच दुचाकीवरून पळून गेला.
ही घटना एवढ्या वेगाने घडली की मेश्राम यांना काही कळायच्या आधीच चोरटा पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरट्याचा हा डाव स्पष्टपणे दिसून आला आहे. फुटेजमध्ये आरोपी मेश्राम यांच्याशी बोलत असताना आणि नंतर साखळी हिसकावून पळ काढताना दिसत आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नागपूर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना नवीन नाहीत, पण सही करण्याच्या बहाण्याने फसवणूक करून चोरीची ही पद्धत नवी आहे. यामुळे नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.