नागपूर महापालिकेच्या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन टप्प्यांमध्ये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षणाकडे अधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
advertisement
सध्या मनपाच्या ताब्यात मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा चार माध्यमांच्या 28 शाळा आहेत. मार्च 2025 मधील दहावीच्या परीक्षेत या शाळांचा एकूण निकाल 90.28 टक्के इतका लागला आहे. याच विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार सामाजिक विकास विभागामार्फत आर्थिक मदतीचा निर्णय प्रत्यक्षात आणला जात आहे. मनपा शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, वातावरण आनंददायी बनविणे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे या उद्देशाने विविध योजना राबवल्या जात आहेत.
मुलींसाठी उपस्थिती भत्ता
मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मनपाने वेगळी योजना राबवली आहे. मनपा शाळांमधील मुलींना वार्षिक 4 हजार रुपयांचा उपस्थिती भत्ता दिला जातो. या माध्यमातून मुलींचे शैक्षणिक प्रमाण वाढविण्यास हातभार लागला आहे. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, शिक्षण महोत्सव आणि क्रीडा महोत्सवांद्वारे त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक मार्गदर्शनही दिले जात आहे.
शाळांच्या गुणवत्तेत वाढ करणाऱ्या योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, पीएम श्री शाळा, मिशन नवचेतना, द हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट आणि स्मार्ट सिटी या योजनांच्या अंमलबजावणीमुळे मनपा शाळांची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व उपक्रमांमुळे नागपूर महानगरपालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नव्या उंचीवर पोहोचत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे आर्थिक साहाय्य हे त्यांच्या भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.






