आज पहाटेपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू झाला. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचत आहे.
advertisement
रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात असल्याची देण्यात आली आहे.
50 म्हशींचा मृत्यू....
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडुन 50 म्हशीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी साचले आहे. त्याशिवाय पहाटे या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. भिंगोली, भेंडेगाव , हसनाळ, रावणगाव , सांगवी या गावांना पुराचा फटका बसला. गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले .काही लोकं अडकल्याची प्राथमिक माहिती असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
पैनगंगा नदीला 19 वर्षांनी पूर, शेतीचं मोठं नुकसान
नांदेड जिल्ह्यातील सतत पडलेला मोठा पाऊस आणि इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैंनगंगा नदीला पूर आला. तब्बल 19 वर्षानंतर या नदीचा मोठा पूर आला. नदीचे पाणी नदी पात्रापासुन किमान दोन किमीपर्यंत साचले. त्यामुळे पैनगंगा नदीला समुद्राचे स्वरूप आले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव , हिमायतनगर, माहुर आणि किनवट या चार तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. चार ही तालुक्यातील नदी काठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. धरणातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पूर अजून ओसरला नाही.
नांदेड जिल्ह्यातील झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीला पुर आला. या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.नांदेड जिल्हयातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहुर या चार तालुक्यात नदी काठच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सोयाबीन, कापूस, मूग तूर ही पिकं अख्खी पाण्याखाली गेली. सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. आता, बुडीत क्षेत्र जाहीर करुन तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
येलदरी धरणाचे दरवाजे उघडले...
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून येत असलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.