मराठवाड्यातील धाराशिव, लातूरसह नांदेडमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील सर्व सिंचन प्रकल्प भरले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यांतील प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
नांदेड, धाराशिव आणि लातूरमधील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खासगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनांवरील शैक्षणिक संस्थांना 27 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात गेल्या काही काळापासून पावसाने कहर केला आहे. नद्यांना आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने चिंता वाढली आहे.