या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत. मुदखेड तालुक्यातील एका गावातील 6 वर्षीय मुलीचा मृतदेह 15 जानेवारी रोजी आढळल्याने खळबळ उडाली होती. मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर चिमुकलीचा मृतदेह मिळाला होता. 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपासून ही मुलगी बेपत्ता होती. गावापासून 12 किलोमिटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळला होता. चिमुकलीवर क्रूरतेने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या निर्दयी घटनेचा तपास लावण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली होती.
advertisement
पोलिसांची पथक घटना घडल्यापासून गावात तळ ठोकून होती. पोलिसांनी गावातच कॅम्प तयार केला होता. अखेर पोलिसांचा तपास कामी आला. पोलिसांच्या श्वानाने अनेकवेळा गावातील एकच ठिकाण दाखवल्याने पोलिसांचा संशय बळावला. खात्री पटल्यावर पोलिसांनी गावातील रहिवासी 23 वर्षीय दशरथ पांचाळ याच्या मुसक्या आवळल्या. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आरोपीने कबूल केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. या गुन्ह्यात आरोपीला आणखी एकाने मदत केल्याचा संशय आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.
मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट
मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुलीचे 14 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. काल या चिमुकलीचा मृतदेह गावापासून 12 किलोमिटर दूर मुदखेड उमरी रोडवर आढळला होता. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्ह्याची कलमे वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची वेगवेगळी पथकं परिश्रम घेत आहेत. संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.