भाजपा आणि काँगेसमध्ये थेट लढत
नांदेड लोकसभेसाठी यंदा भाजप आणि काँगेसमध्ये थेट लढत झाली. भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँगेसकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ही लढत भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. पण नंतर मात्र काँगेसने देखील जोर धरला. आणि शेवटच्या आठवड्यात नांदेड लोकसभेची लढत अत्यंत चुरशीची ठरली. अटीतटीच्या या सामन्यात विजयाचा दावा दोन्ही उमेदवाराना करता आला नाही.
advertisement
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा परिमाण काय होणार?
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण आमदार होते. आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्याना राज्यसभा दिली. अर्थात बेरजेचे गणित खेळत भाजपाने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. नांदेडसह मराठवड्यात अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाला फायदा होईल अशी भाजपाची आशा होती. अशोक चव्हाण भाजपात आल्याने नांदेडची लढत एकतर्फी होईल असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र, नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाचे जास्त स्वागत झाले नाही.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला नसून त्यांना केंद्रिय यंत्रणांची भीती दाखवून भाजपाने पक्षात बळजबरी घेतला असा प्रचार नांदेड मधील काँगेस नेत्यांनी केला. अर्थात हा आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावला. आपण स्वतःहुन भाजपात प्रवेश केल्याचं अशोक चव्हाण यांना वारंवार सांगाव लागलं. तरीही अशोक चव्हाण यांना मानणारे समर्थक आणि त्यांचे चाहते मात्र भाजपा प्रवेशामुळे नाराज दिसले. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपात गेल्याने भाजपालाच जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलनाचा भाजपला फटका
मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यासह नांदेडमध्ये देखील मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता अधिक होती. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीदरम्यान सर्व पक्षीय नेत्यांची मराठा समाजाकडून अडवणूक झाली. खासदर प्रताप पाटील चिखलीकर, काँगेसचे आमदार मोहन हंबर्डे, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अशोक चव्हाण यांना देखील प्रचंड विरोध झाला. अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची राजकीय वारस श्रीजया चव्हाण यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. चिखलीकर यांच्या कुटुंबियाला देखील अनेक गावात अडवण्यात आले. अर्थात मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका देखील भाजपाला बसण्याची शक्यता आहे.
वाचा - '4 जूननंतर नोटाबंदीप्रमाणे तुम्ही फक्त..' उद्धव ठाकरेंचा PM मोदींविषयी मोठा दावा
भाजपकडून जोरदार प्रचार, प्रचारात काँगेसची मात्र पिछेहाट
नांदेड लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपाने यंदा अधिक जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नांदेड मध्ये भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात चार वेळा दौरा करुन प्रचार सभा घेतल्या. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी अख्खा मतदार संघ पिंजून काढला. भाजपाच्या तुलनेत मात्र काँगेस नेत्यांची तशी लगबग दिसून आली नाही. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँगेस नेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.
वंचित फॅक्टर चालणार का?
2019 साली नांदेड लोकसभेत वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी एक लाख साठ हजार मत घेतली होती. काँगेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा 40 हजार मतांनी पराभव झाला होता. यंदा मात्र नांदेड मध्ये वंचित फॅक्टर चालला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने काही प्रमानात वंचितला मत गेली. मात्र, मतांचं जास्त धृवीकरण न झाल्याने भाजपाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठा, मुस्लिम मतांची टक्केवारी वाढली
यंदाच्या नांदेड लोकसभा निवडणुकीत मराठा आणि मुस्लिम मतांची टक्केवारी वाढली आहे. मुस्लिम बाहुल आणि मराठा बाहुल गावात मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. या मतांचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला हे आताच सांगता येणार नाही.
2019 लोकसभा
मतदान टक्केवारी 65.18
- अशोक चव्हाण- काँगेस - 4 लाख 46 हजार 658
- प्रताप पाटील चिखलीकर - भाजपा - 4 लाख 86 हजार 806
भाजपा - 40 हजार 248 मतांनी विजयी
नांदेड लोकसभा 2024
- उमेदवार - 23
- मतदान टक्केवारी - 60.94 टक्के
- - नांदेड उत्तर - 58.53 टक्के- नांदेड दक्षिण - 60.29
- - भोकर - 65.37
- - नायगाव - 65.32
- - देगलुर - 59.82
- - मुखेड - 56.76
- - एकूण मतदार - 18 लाख 51 हजार 843
- - झालेल मतदान - 11 लाख 28 हजार 570
- - पुरुष - 6 लाख 6 हजार 488
- - स्त्री - 5 लाख 22 हजार 62
- - तृतीयपंथी- 20