नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भाग्यश्रीने राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत भाग्यश्रीचे वडील सुनील बन्सी चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीला तिचा पती गौरव चौधरी याचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
advertisement
आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा
घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. यावेळी आई-वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदन झाल्यानंतर भाग्यश्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आकस्मिक मृत्यूची नोंद
शहादा पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हवालदार छोटुलाल शिरसाठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. संशयित पतीचा मोबाईल कॉल रेकॉर्ड (CDR) आणि मेसेजची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आणि ठोस पुरावे हाती लागल्यास संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
दरम्यान, या घटनेमुळे शहादा शहरात हळहळ व्यक्त होत असून, पती-पत्नीच्या नात्यातील संशयाने एका तरुण महिलेचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
