संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात?
भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असा होतो. या काळात हंगामानुसार विविध भाज्या येतात आणि त्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या भाज्यांची एकत्रित भाजी तयार केली जाते, जी भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते आणि ती तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद, कारण काय? पाहा सविस्तर
advertisement
भोगी सण शेतात आलेल्या नव्या पिकांसाठी भगवान इंद्राचा आशीर्वाद मानून साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, इंद्रदेवाने धरतीवर पिके आणि धनधान्य भरभराट व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे वर्षभर पिकांची भरभराट व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. भोगीचा सण फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही; देशभरात वेगवेगळ्या नावांनी आणि स्थानिक परंपरांनुसार हा सण साजरा केला जातो.
भोगीची भाजी खाण्याचे फायदे
भोगीच्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी केवळ परंपरेसाठी नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हंगामी भाज्या आणि डाळी एकत्र करून बनवलेली ही भाजी शरीराला आवश्यक पोषण देते. हिवाळ्यात शरीरात निर्माण होणारा कफ कमी होतो, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे अनेक फायदे ही भाजी खाल्ल्यामुळे होतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी या हंगामी भाज्यांचे सेवन न करणारी व्यक्ती आरोग्यासाठी उपयुक्त गोष्टींपासून वंचित राहते, असे मानले जाते. ‘जो न खाई भोगी, तो सदा रोगी’ अशी म्हणही प्रचलित आहे.





