श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद, कारण काय? पाहा सविस्तर
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bhimashankar Temple: श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असून येथे देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे मंदिराच्या विकास आराखड्यानुसार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांना बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद राहणार असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने भीमाशंकरकडे जाणारे सर्व रस्ते तात्पुरते बंद केले आहेत.
भीमाशंकरकडे जाणारे सर्व रस्ते तात्पुरते बंद
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असून येथे देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या मंदिराच्या विकास आराखड्यानुसार सभामंडपाचे नूतनीकरण तसेच परिसरातील विविध बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांच्या कालावधीत भाविकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन महिन्यांसाठी मुख्य मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, घोडेगाव आणि खेड पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसर तसेच मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग तात्पुरत्या स्वरूपात भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत.
advertisement
भीमाशंकरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर बॅरिकेट्स लावण्यात आले असून मंदिर परिसरात पोलिसांचा 24 तास बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यापूर्वीच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे.
advertisement
288 कोटींचा सर्वांगीण विकास आराखडा
view commentsश्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी राज्य सरकारने सुमारे 288.17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यात भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे.यामध्ये दर्शन रांगेचे योग्य नियोजन, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच भाविकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराच्या ऐतिहासिक रचनेला कोणताही धक्का न लावता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:41 AM IST









