माध्यमांशी संवाद साधताना झिरवळ यांनी सांगितले की, "मंत्रालयात घडलेला हा प्रकार अत्यंत दयनीय असून हे प्रशासनाला कलंक लावणारं वर्तन आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी म्हटले.
ती लाच त्याने स्वत: साठी घेतली...
पोलीस कोठडीत असलेल्या ढेरंगे यांची आता विभागांतर्गत स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. राजेंद्र ढेरंगे यांनी ही लाच स्वतःसाठी घेतल्याची कबुली दिली आहे. यामध्ये माझ्या कोणत्याही ओएसडीचा (विशेष कार्य अधिकारी) सहभाग असल्याचे त्यांनी म्हटलेले नाही," असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
advertisement
विभागात सुनावणी, स्टे देणे किंवा परवान्याबाबतचे निर्णय ही नियमित प्रक्रिया आहे, त्यात कोणावरही बळजबरी केली जात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
राजीनामा देणार? पक्षात आपला वैरी....
यावेळी पत्रकारांनी त्यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता त्यांनी सूचक भाष्य केले. "कोणाला मंत्रिपद द्यायचे आणि कोणाचे काढायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे," असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अद्याप भेट झालेली नसून, लवकरच त्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माझे कोणीही वैरी नाहीत," असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
काय आहे लाचखोरीचे प्रकरण?
अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना नुकतीच लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. ढेरंगे हे मुळात अन्नपुरवठा विभागाचे कर्मचारी असून ते प्रतिनियुक्तीवर झिरवाळ यांच्या कार्यालयाशी संबंधित विभागात कार्यरत होते. या कारवाईनंतर झिरवाळ यांनी ढेरंगे यांना तत्काळ त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे.
