प्रसादावरून वादाची ठिणगी
मिळालेल्या माहितीनुसार, बोधले नगरातील सुयोगनगरात रेखा बोरसे, योगेश बोरसे आणि सनी बोरसे ही तीन भावंडे एकत्र राहतात. शुक्रवारी (९ जानेवारी) परिसरात एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. थोरला भाऊ योगेश उर्फ बाळा दत्तू बोरसे (वय ३२) हा या भंडाऱ्यात जेवायला गेला होता. इथं जेवण केल्यानंतर तो घरच्यांसाठी प्रसादाचं पार्सल घेऊन घरी आला.
advertisement
घटनेच्या दिवशी दुपारी धाकटा भाऊ सनी हा दारुच्या नशेत घरी आला. त्याने 'भंडारा घरी का आणला?' यावरून योगेशशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. मात्र स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला आणि सनी घराबाहेर निघून गेला.
मध्यरात्री पुन्हा वाद आणि जीवघेणा हल्ला
दुपारचा राग मनात धरून सनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पुन्हा पूर्णपणे नशेत घरी परतला. त्याने झोपेत असलेल्या योगेशला पुन्हा प्रसादाच्या कारणावरून डिवचले. हा वाद इतका विकोपाला गेला की, सनीने योगेशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने जवळ असलेला लाकडी दांडा उचलून योगेशच्या कपाळावर आणि पाठीवर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला.
या घटनेनंतर बहीण रेखा बोरसे यांनी जखमी अवस्थेतील योगेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराला अंतर्गत गंभीर जखमा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेखा बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी भाऊ सनी बोरसे याला अटक केली.
