नाशिक : शहरातील सावतानगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आज मतदानाच्या दिवशीच माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर रोख रक्कम वाटली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. या अफवेमुळे राजकीय वातावरण तापले असून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
advertisement
मुकेश सहाणे यांचा गोंधळ
या प्रकरणात अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी थेट सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन गोंधळ घातला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जचा वापर करण्यात आला. यानंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
लक्ष्यवेधी लढत
दरम्यान, नाशिकच्या प्रभाग क्रमांक २९ मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सावतानगर परिसरातील ही घटना राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरत आहे. पैसे वाटपाच्या आरोपांवरून अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसला तरी या अफवेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापवले आहे.
दुसरीकडे, या प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेकडून याबाबतचे पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे.
विशेष म्हणजे, मुकेश शहाणे हे मूळचे भाजपचे उमेदवार होते. मात्र, तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. आता मनसेचा पाठिंबा मिळाल्याने शहाणेंची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
