कोण जिंकलं? कोण पराभूत झालं?
या निवडणुकीत जुने, अनुभवी नेते, माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचा कल जवळपास सर्वच पक्षांत दिसून आला. विशेषतः भाजपकडून घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. त्यातील अनेकांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र प्रशांत दिवे हे पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, माजी महापौर बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी यांनीही यश संपादन केले.
advertisement
याशिवाय विनायक पांडे यांची सून आदिती पांडे, वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, भाजप नेते विजय साने यांचे पुत्र अजिंक्य साने, सध्या तुरुंगात असलेल्या उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांनीही निवडणुकीत बाजी मारली. भाजप नेते लक्ष्मण सावजी यांची कन्या नुपूर सावजी, दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील तसेच यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचाही विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. या सर्व निकालांमुळे घराणेशाहीचा आरोप असतानाही मतदारांनी अनुभव, ओळख आणि स्थानिक प्रभावाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून आले.
दरम्यान, पक्षांतर्गत पातळीवर घराणेशाहीविरोधात भूमिका घेण्याचे प्रयत्नही झाले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांचे तिकीट कापण्यात आले. हा निर्णय पक्षासाठी कठीण असला तरी, त्यामागे नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून आला.
एकूणच, नाशिक महापालिका निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या नेतृत्वाचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. अनुभवी घराण्यांतील अनेकांना संधी मिळाली, तर काही ठिकाणी मतदारांनी बदलाची नोंद घेतली.
