शासकीय सदनिका प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय विरोधात आल्यानंतर आणि भारतीय जनता पक्षाकडून दबाव वाढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली. मात्र तरीही विरोधकांनी लक्ष्य केल्याने गुरुवारी अखेर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केली. त्यानंतर लगोलग कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नाशिक पोलिसांची टीम कोकाटेंना अटक करण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांशी चर्चा करून पुढील कारवाई केली.
advertisement
कोकाटे यांच्यावरील कारवाईची इनसाईड स्टोरी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवल्याने आणि खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवून शिक्षा कायम ठेवल्याने नाशिक पोलिसांनी अटक वॉरंट जारी केली. कोकाटे यांच्या बचावाचे प्रयत्न अजित पवार यांनी केले. परंतु दोषी मंत्र्यांचा बचाव करता येणार नाही, असे सांगत भाजपने राष्ट्रवादीवर दबाव वाढवला. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच कोकाटे यांची खाती कोणाकडे देणार, अशी विचारणा अजित पवार यांना केली. त्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांच्याशी चर्चा करून खाती काढून घेत असल्याची कल्पना त्यांना दिली. बुधवारी रात्री कोकाटे यांच्याकडील खाती काढून ती अजित पवार यांच्याकडे सोपविल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी रात्री जारी केला.
सरकारवर दबाव वाढल्याने कारवाई
राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने अशा काळात मंत्र्यांविरोधात अटक वॉरंट निघाल्याने सरकारवर मोठी टीका होत होती. तसेच अजित पवार कोकाटे यांना अभय देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने सरकारच्या प्रतिमेला धक्का लागत होता. त्यामुळे फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत कोकाटे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे संकेत दिले. त्यानंतर पक्षाध्यक्ष या नात्याने अजित पवार यांना पुढाकार घेऊन कोकाटे यांच्याकडील खाती काढून घ्यावी लागली.
