सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. कुंभमेळ्यासाठी देशासह परदेशातील भाविक उपस्थिती लावणार आहेत. कुंभमेळ्यासाठी भाविक नाशिक रेल्वे स्थानकातून येणार आहेत, त्यासाठी सध्या नाशिक रेल्वेचा कायापालट केला जात आहे. सध्या नाशिक रेल्वे स्थानकावर एकूण 4 फलाट आहेत. आता लवकरच पाचवा फलाट बनवणार असल्याची माहिती मिळत आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानकाचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. यामध्ये नव्या पाचव्या प्लॅटफॉर्मची उभारणी, विस्तारित परिसर आणि प्रवाशांच्या हालचालीसाठी आवश्यक जागा निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे.
advertisement
कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेताना, मे 2025 मध्ये रेल्वे अधिकार्यांनी देवळाली, नाशिक रोड, खेरवाडी आणि ओढा या स्थानकांची पाहणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व स्थानकांच्या विकासासाठी तब्बल 1011 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आला. त्या निधीला रेल्वे मंत्रालयाकडून औपचारिक मान्यता देण्यात आली. रेल्वे स्थानकाचा करण्यात येणार्या कायापालटामध्ये प्रवाशांसाठी नवीन ब्रिज आणि रूफ प्लाझा सुद्धा उभारले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना येणं जाणं अधिकच सोयीस्कर होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशनसोबतच शेजारी असणाऱ्या एसटी महामंडळ आणि सिटी लिंक बस स्टॉपचाही विकास केला जाणार आहे. या तिनही वाहतूक माध्यमांना एकत्र जोडून प्रवाशांना अखंड आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे प्रवाशांच्या तुलनेत अधिकच सक्षम, आधुनिक आणि प्रवासासाठी सोयीस्कर बनवले जाणार आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी नियोजन अधिक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांसोबतच नाशिक रेल्वे स्थानकाचाही कायापालट करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे.
नाशिक रेल्वे स्थानकाच्या विकासकामांसाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल 166 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नाशिक स्थानकावर नवीन इमारत, 12 मीटर रुंद रूफ प्लाझा, 6 मीटर रुंद पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज), 2 स्टॅलिंग लाईन्स, तसेच होल्डिंग एरिया उभारणीसारखी मोठी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय, यार्डचे नूतनीकरण, शौचालयांचे सुधारणा काम, तसेच प्रवासी सुविधांचा विस्तार या बाबींनाही प्राधान्य दिले आहे. रेल्वे प्रशासनाने 'बाटली मशीन मध्ये टाका आणि पैसे कमवा' या तत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. नाशिक रेल्वे स्थानकावर तब्बल 25 प्लास्टिक क्रशर मशीन बसवण्यासाठी प्रशासनाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे. सध्या दोन मशीन बसवण्यात आले असून नागरिक या मशीनचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे. रेल्वे स्थानक अधिकार्यांच्या मते गर्दीच्या काळात प्लास्टिकने होणारे पर्यावरणाचे नुकसान या मशीनमुळे टाळता येणे शक्य होणार आहे.