नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर नाशिकमधील गोदाघाटावरील सर्व मंदिरे पाण्यात गेली आहेत. पाण्याची पातळी वाढतच असून दुतोंड्या मारुतीच्या वरून पाणी वाहत आहे. पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
Jayakwadai Dam: धोका वाढला! जायकवाडीच्या 27 दरावाजांतून विसर्ग वाढवला, गोदावरीकाठी सतर्कतेचा इशारा
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला
मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढला आहे. सध्या गंगापूर धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. हा विसर्ग नाशिक शहराकडे येत असून यात इतर नदी नाल्यांतील विसर्ग देखील येत आहे. त्यामुळे शहरातील होळकर पूल परिसरात 1849 फुटांवर पाणीपातळी आहे. तर 19 हजार 79 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नदीने धोका पातळी ओलांडली असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह इतर तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचप्रमाणे पंचवटीतील अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत पाणी पोहचले आहे. टप्प्याटप्प्याने विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचे प्रमाण आणखी वाढणार असून आजूबाजूच्या दुकानदारांनी आणि गोदाकाठावरील भाजी विक्रेत्यानी याची नोंद घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.