नवी मुंबई : नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरातील एका खासगी शाळेतील शिक्षिकेविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यासोबत सोशल मीडियावर अश्लिल चॅट केले तसंच स्वत:चे अर्धनग्न व्हिडिओही त्याला पाठवल्याचे समोर आले आहे. हे व्हिडिओ संबंधित विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असल्याचं निदर्शनास आलं.
विद्यार्थ्याच्या पालकांनी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने शिक्षिकेला ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला शिक्षिका 35 वर्षांची आहे.
advertisement
मुंबईतल्या शिक्षिकेला जामीन
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या शाळेमध्येही असाच प्रकार समोर आला होता. अल्पवयीन विद्यार्थ्यावर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तसंच कारमध्ये आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या शिक्षिकेवर आहे. महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दारू पाजूनही त्याच्यासोबत संबध ठेवल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं. पण सुनावणीवेळी या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. आरोपी शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतचे संबंध एकतर्फी नव्हते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसंच या शिक्षिकेला कोर्टाने जामीन दिला.
आरोपी शिक्षिकेने कोर्टामध्ये मुलासोबतच्या चॅटचे काही स्क्रीनशॉट आणि मुलाने शिक्षिकेला लिहिलेली पत्रही पुरावे म्हणून सादर केली होती. विद्यार्थ्यासोबत आपण कधीही जबरदस्ती केली नव्हती, उलट तोच या संबंधांमध्ये राहण्यासाठी हट्टाला पेटला होता. आपण त्याला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्नही केला होता, असा दावा संबंधित शिक्षिकेने जामीन मागताना कोर्टापुढे केला होता.