ऐन दिवाळीत नवी मुंबईत दोन आगीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनांनी नवी मुंबई हादरली आहे. या दोन्ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पहिली घटना ही वाशी सेक्टर 14 मध्ये घडली होती.एमजीएम कॉम्प्लेक्सच्या दहाव्या आणि बाराव्या मजल्यावर रात्रीच्या सुमारास ही आगीची घटना घडली होती. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या 80 वर्षीय कमला जैन तसेच बाराव्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश होता.या सुंदर बालकृष्णन (40), पत्नी पूजा राजन (40) आणि वेदीका या सहा वर्षीय चिमुकलीचा आगीच होरपळून मृत्यू झाला होता. दिवाळीच्या रोषणाईत शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
या घटनेसोबत कामोठेमध्ये देखील अशीच घटना घडली होती. कामोठे सेक्टर 36 मधील आंबे श्रध्दा सहकारी गृहनिर्माण सोसायटीतही आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रेखा सिसोदिया वय (45)आणि मुलगी पायल सिसोदिया (19) या मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला होता.या घटनेत सुरूवातीला शॉर्ट सर्किट झाला होता,त्यानंतर सिलिंडरचा स्फोट होऊन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
नवी मुंबईत एकाच दिवशी झालेल्या आगीच्या दोन दुर्घटनांमध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.तसेच ऐन दिवाळीत नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.