दिल्ली : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि गँग हाती लागल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. पण आता धनंजय मुंडेंना परत आणण्यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एका वरिष्ठ नेत्यानेच याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
महाविकास आघाडी सरकार असताना कृषि खात्यातील विक्री प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लिन चिट मिळाली. त्यानंतर धनंजय मुंडेंची परतीची चर्चा रंगली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच तसेच संकेत दिले होते. पण, आता दिल्लीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याकडून धनंजय मुंडेंसाठी लॉबिंग सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध नाही, वातावरण शांत झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना संधी द्यावी, असा सूरच या नेत्याने लगावला आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जर धनंजय मुंडे दोषी नसतील तर राजीनामा घ्यायचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता. मात्र, जनभावनेचा आदर करून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता, अशी माहितीच अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याने दिली.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही. हा संदेश जनतेत जाणं गरजेचं आहे, असा प्रयत्न आता राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना तब्येत ठीक नसल्याचे कारण देऊन राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं होतं.
मुख्यमंत्री फडणवीस देतील का पुन्हा संधी?
पण, राष्ट्रवादीच्या गोटातून धनंजय मुंडेंच्या परतीच्या प्रवासासाठी कितीही प्रयत्न सुरू असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनुभाऊंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देतील का, हेही पाहण्याचे ठरणार आहे. कारण, मागील काही दिवसांपासून मित्रपक्षातील मंत्र्यांमुळे महायुती सरकारची नाचक्की झाली आहे. त्यामुळेच रम्मी प्रकरणात माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आणखी शिवसेनेच्या मंत्र्यांचीही प्रकरण समोर आली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंचं कमबॅक सहज सोप्पं असेल अशी शक्यता कमीच आहे.