मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव भागातील एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि हवेली पंचायत समितीचे माजी सभापती व स्थानिक रहिवासी बंडू खांदवे यांच्यात वाद झाला. एका सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमासाठी हे दोघेही उपस्थित होते. वादानंतर आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर त्यांच्या गाडीच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
या घटनेनंतर बंडू खांदवे यांच्या समर्थकांनी आमदार पठारे यांना घेराव घातला होता. हा प्रकार घडल्यानंतर आमदार पठारे यांचे समर्थक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
परस्परविरोधी तक्रारी दाखल
या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून लोहगाव पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आमदार बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडून कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एका स्थानिक नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर आमदारांना धक्काबुक्की करत त्यांच्या चालकाला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहेत बापू पठारे?
बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.