राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावर सूचक भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या संदर्भात अजिबात कोणताही निर्णय झालेला नाही. पक्षात यावर कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. शरद पवार साहेबांनी देखील आम्हाला यासंदर्भात कुठलाही संदेश दिलेला नाही.” त्यामुळे सध्या सोशल मीडियावर किंवा काही माध्यमांतून सुरू असलेली ही चर्चा ही केवळ चर्चा आहे, असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
म्हणून त्या आमदारांचं तसं मत!
रोहित पवार म्हणाले, “आमच्या पक्षाचे ठराविक दहा आमदार आहेत. कदाचित काही आमदारांना वाटत असेल की, लोकांसाठी काम करायचं असेल तर सत्तेत सहभागी व्हावं लागेल. त्यामुळेच त्यांनी असे मत व्यक्त केले असेल. कदाचित याच पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी एखाद्या मुलाखतीत याचा उल्लेख केला असावा, असेही त्यांनी म्हटले.
अजितदादांसोबत जाणार? रोहित पवार म्हणतात...
अजित पवार गटासोबत जाण्याबाबत विचारलं असता, रोहित पवार म्हणाले, “जर शरद पवार साहेबांनी यासंदर्भात मला थेट प्रश्न विचारला, तर मी माझं मत नक्की मांडेन. पण आत्ता यावर काही बोलणं योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार हे यावर बैठक बोलावतील की नाही हे सांगता येत नसल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत...
शरद पवार पुढील पिढीला जबाबदाऱ्या सोपवण्याच्या तयारीत असल्याचंही रोहित पवार यांनी सूचित केलं. “सुप्रिया ताईंनी आम्हाला जे काही सांगितलं, किंवा चर्चा केली, त्याविषयी योग्य वेळी मी तुम्हाला माहिती देईन,” असं त्यांनी नमूद केलं.
राज्यातील जनतेच्या समस्या गंभीर असल्याचं सांगत, रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. “या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे. कामाला सुरुवात केली पाहिजे. बहुधा याच कारणामुळे शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं वक्तव्य केलं असावं,” असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.