याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (एनडीपीएस) रविवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत 34 प्रकारचे अमली पदार्थ आणि एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मध्यरात्री अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा, एनडीपीएस आणि अवैध हत्यार बाळगण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख नियाज शेख नजीर ऊर्फ सिकंदर (वय 35. रा. मुजीब कॉलनी, गल्ली नं. 2. कटकट गेट) याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
एनडीपीएस पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना आरोपी सिकंदर याने अमली पदार्थ विक्रीस आणल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार संदीप धर्मे, महेश उगले, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, छाया लांडगे यांच्यासह फॉरेन्सिक तज्ज्ञ प्रीती क्षीरसागर, महेश बळी, प्रसाद देशमुख यांनी छापा टाकला. या कारवाईत दोन पिशव्यांमध्ये 12 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचं एमडी ड्रग्ज सापडलं.
याशिवाय एका कपाटातील पिशवीमध्ये रिकामं मॅक्झिन असलेला गावठी कट्टा आणि 20 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची संशयित पावडर आढळली. याच ठिकाणी काळी जादू करण्यासाठीचं साहित्य सापडलं. पोलिसांनी जनावरांची दोन हाडे, एक कासवाचं आवरण असलेलं हाड, एक मुखवटा, चामडी हंटर, बारीक कवडमा, 109, 55 आणि 33 कवट्यांच्या माळा, चंदेरी रंगाची 84 आणि सोनेरी रंगाची 79 नाणी सापडली देखील जप्त केली आहेत. याशिवाय, धातूचं कासव, काळ्या रंगाचे दगडगोटे, कुंकू, हळद, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागलं आहे.