कळवण तालुक्यातील धाकटी गावातील शेतमजूर विठोबा पवार हा काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी थेट अपहरण झाल्याचा आणि खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या संशयावरून ग्रामस्थांमध्ये संताप पसरला. गावकऱ्यांनी धाकटी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या धरत पोलिसांवरच दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.
advertisement
बेपत्ता विठोबा रात्री अचानक घरी आला
तसेच, विठोबा पवारच्या नातेवाईकांनीही अपहरण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. या सगळ्या घडामोडींमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शनिवारी रात्री उशिरा विठोबा पवार हा अचानक घरी परतला. तो सुखरूप परत आल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला.
विठोबा नेमका कुठे गेला होता?
विठोबा नेमका कुठे गेला होता? का बेपत्ता झाला होता? याबाबत मात्र अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी त्याच्याकडून सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या नव्या घडामोडीमुळे ज्यांच्यावर अपहरण आणि खूनाचा संशय घेतला जात होता, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, पोलिस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी आधीच गुन्हे दाखल असल्याने या प्रकरणाचा कायदेशीर गुंता वाढण्याची चिन्हे आहेत. एकीकडे बेपत्ता व्यक्ती सुखरूप घरी आल्यानंतर गावात शांततेचे वातावरण निर्माण झाले असले तरी खोट्या संशयावरून भडकलेला जमाव आणि त्यातून उभी राहिलेली दंगल यावरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कळवण पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.