कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ हा युरोपात गेल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली आहे. नीलेश घायवळ याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. दुसरीकडे सचिन घायवळ याच्या विरुद्धही पुणे पोलिसांनी मकोका कायद्याअन्वये कारवाई केली आहे.
मीडिया ट्रायलमुळे आपल्याविरोधात कारवाई झाल्याचा नीलेशचा दावा
advertisement
कुख्यात गुंड नीलेश घायवळने केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आपल्यावरील कारवाईविरोधात नीलेश घायवळने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मीडिया ट्रायलमुळे आपल्याविरोधात कारवाई झाल्याचा दावा नीलेश घायवळ याने केला. तसेच अटकेची कारवाई न करण्याची मागणी नीलेशने याचिकेतून केली आहे. घायवळ आणि टोळीतील सदस्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
नीलेश घायवळचे 'उद्योग'
गु्न्हेगारीच्या माध्यमातून अमाप पैसा मिळवून नीलेश घायवळ याने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात घर, जमीन, फ्लॅट अशी संपत्ती घेतली आहे. पोलिसांनी पुणे, मुळशी, जामखेड आणि धाराशिवच्या जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे जप्त केली आहेत.
घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला. त्याने घायवळ ऐवजी गायवळ असे नाव वापरून पासपोर्ट मिळवला. खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असताना घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला, याकामी त्याला कुणी मदत केली, शिफारस करणारा तो मंत्री, नेता किंवा अधिकारी कोण? असा प्रश्न चर्चिला जात आहे.