राज्यात पहिलीपासून त्रिभाषाच्या मुद्याआडून हिंदी सक्ती होत असल्याच्या दाव्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच काही परप्रांतीयांनी मराठीचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्यांना मनसैनिकांनी हिसका दाखवला. त्यावर भाजपचा खासदार निशिकांत दुबे याने राज ठाकरेंवर टीका करताना मराठी माणूस आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली. त्याचे पडसाद राज्यात उमटलेच, शिवाय, संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना चांगलेच फैलावर घेतलं. एका वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे.
advertisement
तीन दिवसांपासून दुबेंचा शोध...
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या या खासदारांकडून निशिकांत दुबे यांचा शोध सुरू होता. बुधवारी कामकाज स्थगित झाल्यानंतर संसदेच्या लॉबीत त्यांनी दुबेंना गाठलं. “मराठी लोकांविरोधात मारण्याची भाषा कशी काय करू शकता? कोणाला कसा ‘आपटून’ मारणार आहात? ही काय अर्वाच्य भाषा आहे तुमची?” असा थेट सवाल दुबेंना केला.
काय म्हणाल्या महिला खासदार?
निशिकांत दुबेंना घेरुन मराठी महिला खासदारांनी चांगलंच फैलावर घेतलं मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही... मराठी भाषकांविरोधातील तुमची ही आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या समोर आहोत, आम्हाला तुम्ही पटकून पटकून मारा, असा आक्रमक पवित्रादेखील या महिला खासदारांनी घेतला. महिला खासदारांचे हे रुप पाहून निशिकांत दुबेंचा सूरही नरम झाला. त्यातच वर्षा गायकवाड यांचा उग्रावतार पाहून अन्य राज्यातील खासदारांना नेमके काय घडले, तेच समजलं नाही. 'जय महाराष्ट्र'च्या घोषणांनी लॉबी दणाणून गेल्यानंतर कँटिनकडे निघालेले अन्य मराठी खासदारही तेथे पोहोचले आणि दुबे यांना जाब विचारू लागले. त्यानंतर दुबे हे आपल्या मार्गाने निघून गेले.
दुबेंचा सूर मावळला...
काही वेळाने दुबे कँटिनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांना हटकले आणि काय घडलं हे विचारले. मात्र, निशिकांत दुबे यांनी त्यांना उत्तर देणे टाळलं. त्याच वेळी काही पत्रकारांनी गायकवाड यांना गाठून लॉबीत घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावर आपण दुबेंना जाब विचारल्याचे त्यांनी सांगितले. नेमके त्याच वेळी दुबेदेखील तेथे आले. गायकवाड यांनी लगेचच पुन्हा 'जय महाराष्ट्र' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर 'आप तो मेरी बहन है,' असे म्हणत हात जोडून दुबे तिथून निघून गेले.
