नागपूर : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजकीय नेते, मंत्री यांना धार्मिक कार्यातून दूर ठेवा, जातील तिथं आग लावतील अशी टिप्पणी गडकरी यांनी केली. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले.
advertisement
नागपूरमधील महानुभाव पंथाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेते आणि मंत्र्यांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. गडकरी यांनी पुढं म्हटले की, मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवा. धर्माच्या नावाखाली राजकारण करणे समाजासाठी हानिकारक आहे. राजकारणी जिथे जिथे प्रवेश करतात तिथे तिथे आग लावल्याशिवाय ते निघत नाहीत. गडकरी पुढे म्हणाले की, जर धर्माला सत्तेच्या हाती दिले तर फक्त नुकसानच होईल.
सत्य बोलण्यास मनाई...
परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगळे आहेत. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. गडकरी पुढे म्हणाले की काही राजकारणी त्याचा वापर करतात. यामुळे विकास आणि रोजगार हा विषय दुय्यम ठरतो. गडकरी म्हणाले की, जीवनाचे मूल्य प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे. सत्य आणि अहिंसेची भावना प्रबळ झाली पाहिजे. मी ज्या क्षेत्रात (राजकारणात) आहे, तिथे मनापासून सत्य बोलण्यास मनाई असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरींनी पुढे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीचा उल्लेख केला. “चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता या मूल्यांचा प्रचार केला. जीवनातील बदल हे व्यक्तीच्या मूल्यांमधून येतात. जीवनात सत्याचा अवलंब करा, कोणालाही दुखवू नका, समाजात प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि समर्पण हीच खरी संपत्ती असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.