कर्जत : मराठी वृद्ध दाम्पत्याकडून त्यांचा बंगला भाडेकरारावर घेतला. मात्र, या भाड्यावरील घराचे मालक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूला मनसेने आपला हिसका दाखवला आहे. बंगला भाड्यावर घेतल्यानंतर करार संपल्यावरही रिकामा करण्यास नकार दिला. त्याशिवाय, या घराचे मूळ मालक असणार्या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच घरात प्रवेश देण्यास अटकाव केला. अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर परप्रांतीय भाडेकरुला घर रिकामं करावं लागलं.
advertisement
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातही घटना घडली. लव्हाळी वाडी परिसरात राहणारे संजय आणि संजना सावंत हे ज्येष्ठ दाम्पत्य आहेत. त्यांनी आपला बंगला 1ऑक्टोबर 2024 रोजी हेमंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव या परप्रांतीय व्यक्तीस 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिला होता. मात्र, करार संपल्यानंतरही श्रीवास्तव यांनी घर रिकामे करण्यास नकार दिला, दोन महिन्यांचे भाडे थकवले आणि मालकांच्या फोनलाही प्रतिसाद देणे थांबवले. इतकेच नव्हे तर त्यांनी सावंत दाम्पत्यालाच त्यांच्या घरात पाय ठेवू दिला नाही.
या सततच्या त्रासामुळे सावंत दाम्पत्य मानसिक तणावाखाली गेले आणि त्यांनी आत्महत्येचा विचारही केला. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची मदत मागितली. पाटील यांनी तत्काळ मनसैनिकांसह नेरळ येथे धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला भाडेकरू श्रीवास्तव यांनी पोलिसांचा आधार घेत पोलिस ठाण्याच्या आडोशाला लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनीही घर रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर श्रीवास्तव यांनी बंगला सोडला.
मनसेच्या हस्तक्षेपानंतर केवळ 24 तासांत दाम्पत्याला त्यांच्या ‘माथेरान व्हॅली’ या बंगल्याचा ताबा परत मिळाला. तर संबंधित परप्रांतीय भाडेकरूला आपला बोरा-बिस्तरा उचलून बाहेर पडावे लागले. महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला. मराठी माणसाला त्रास देणाऱ्यांना मनसे स्टाईलमध्येच धडा शिकवू असेही त्यांनी म्हटले.