शरद पवारांचं पत्र न मिळाल्याने नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलीबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. चौकशीदरम्यान हे पत्र शरद पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे हे पत्र आयोगासमोर सादर करावे, अशी नोटीस भीमा कोरेगाव आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बजावली होती. हे पत्र आयोगाच्या तपासामध्ये महत्त्वाचा दुवा ठरू शकते, असे मानले जात आहे.
advertisement
नोटीसला दाद नाही, अटक वॉरंटची मागणी
आयोगाने कायदेशीर नोटीस बजावूनही, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्यावतीने कोणतेही प्रतिनिधी आयोगासमोर हजर राहिले नाहीत. आयोगाच्या नोटीसला या पद्धतीने बगल दिल्यामुळे, प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. आयोगाच्या कार्यवाहीला सहकार्य न केल्याबद्दल आणि वारंवार नोटीस देऊनही हजर न राहिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तातडीने अटक वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी भीमा कोरेगाव आयोगाकडे सादर केला आहे.
आयोगाने अद्याप निर्णय घेतला नाही
या महत्त्वाच्या अर्जावर भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय दिला नाही. पण प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने अशाप्रकारे अर्ज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा अर्ज आयोगाने मान्य केला, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
