पालघर : पालघर जिल्ह्यातील दांडी परिसरात गडचिंचले साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली आहे. पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. परराज्यातून कपडे विक्रीसाठी आलेल्या चौघांना संशयाच्या भोवऱ्यात सापडत ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, रिक्षातून चार परप्रांतीय व्यक्ती कपडे विक्रीसाठी दांडी गावात दाखल आले होते. हे चौघे गावात फिरून घराघरात कपडे विक्री करत होते. याच दरम्यान गावातील शाळेत जाणाऱ्या काही मुलींचे मोबाईलवर फोटो काढल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. ही बाब लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. काही ग्रामस्थांनी या चौघांना जाब विचारण्यास सुरुवात केली असता वातावरण तणावपूर्ण झाले.
advertisement
विक्रेत्यांना ग्रामस्थांनी घेरलं
गडचिंचले साधू हत्याकांडाची पार्श्वभूमी लक्षात घेता, बाहेरून आलेल्या व्यक्तींविषयी गावकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले. काही वेळात ग्रामस्थांची संख्या वाढत गेली आणि त्या चौघांना रिक्षासह गावाच्या मध्यभागी अडवण्यात आले. यावेळी संतप्त ग्रामस्थांकडून मारहाण होण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती.
मोबाईलमध्ये गावातल्या मुलींचे फोटो काढले, गावकऱ्यांचा आरोप
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांना शांत केले आणि संबंधित चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते परराज्यातून उदरनिर्वाहासाठी कपडे विक्रीसाठी आल्याचे समोर आले. मुलींचे फोटो काढल्याच्या आरोपाबाबत पोलिसांकडून मोबाईल तपासणी करण्यात आली असून त्याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. ग्रामस्थांनीही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संयम राखला. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना कोणतीही शंका असल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे गडचिंचले प्रकरणाच्या जखमा ताज्या असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने ग्रामीण भागात जनजागृती आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
