बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानाच्या महाविद्यालयावर अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता हजारो लोकांनी गर्दी केली होती. अगदी मैदानात उभा राहायला देखील जागा उरली नव्हती. प्रचंड गर्दी असल्याने धक्काबुक्की होत होती. अशावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुढे येऊन गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला.
बारामतीकरांनो, कृपया शांत व्हा. धीर धरा, दादा आपल्यात नाहीयेत. दादांनी जसा संघर्ष केला, ते जसे लढले तसेच आपल्याला लढायचे आहे, असे धीरोदात्तपणे जय पवार म्हणाले. मात्र त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले. पार्थ पवार यांनी त्यांच्या हातातील माईक घेऊन जनतेला आवाहन केले. अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खचून जायचे नाही. आपल्याला संघर्ष करायचाय, उद्या सकाळी १० वाजता दादांना निरोप द्यायला आपण सगळे जण या, असे पार्थ पवार म्हणाले. दोघा भावांनी कार्यकर्त्यांना समजावल्यावर वातावरण काहीसे शांत झाले.
advertisement
अजित पवार उद्या सकाळी आपल्यासोबत असतील- सुप्रिया सुळे
अजितदादांना आपल्याला रुग्णालयात न्यावे लागते आहे. त्यांना आज रात्री तिथेच ठेवण्यात येईल. उद्या सकाळी अजितदादाही आपल्यासोबत विद्या प्रतिष्ठान मैदानावर सकाळी १० वाजता येतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या संपूर्ण संभाषणात त्यांनी अजित पवार यांचे पार्थिव असे म्हणणे टाळले. अजित पवार कायम आपल्या सोबत असतील असेच सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला.
अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंतिम संस्कार, शाह बारामतीला येणार
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात अजित पवार यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित राज्यातले सगळेच मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
