रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम, सामानाची वजन तपासणी अनिवार्य
रेल्वे मंत्रालयाच्या माहिती व प्रसिद्धी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्या सामानाचं वजन करावं लागणार आहे. यासाठी सर्व स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर बॅग ठरवलेल्या वजनापेक्षा जड असेल, तर प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे.
advertisement
सुरुवात यूपीपासून, नंतर देशभरात लागू
प्रवासात घेऊन जाणाऱ्या सामानासंदर्भात पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगड येथे हा नियम लागू करण्यात येणार आहे. हा नियम आधीही रेल्वेने ठरवून दिलाच होता. पण, आता त्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जाणार आहे. यानंतर संपूर्ण देशभरात हा नियम अंमलात येणार आहे.
5 ते 12 वयोगटातील मुलांनाही नियम लागू
5 ते 12 वयोगटातील मुलांनाही सामानाच्या वजनाचा नियम लागू होणार आहे. मात्र, या वयोगटातील मुलांना फक्त अर्ध्या रकमेच्या मर्यादेतच सामान वाहून नेण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजेच ते प्रौढ प्रवाशांइतके वजन नेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणत्याही प्रवाशाचं सामान 50 किलोपेक्षा जास्त वजनाचं असल्यास ते घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
रेल्वे मंडळाकडून लगेजसंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अद्याप परिपत्रक आलेलं नाही. परिपत्रक आल्यानंतरच या नियमांची ठोस अंमलबजावणी सुरु होणार असल्याचं रेल्वे जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे पुणे) हेमंत कुमार बेहेरा यांनी सांगितलं आहे.