फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्यांनी आपल्या हातावर गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. त्यांचे मोबाईल हस्तगत केले असून मोबाईलवरील माहितीच्या आधारे पोलीस अधिकचा तपास करत आहे.
या प्रकरणात माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी अनेकदा महिला डॉक्टरला तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी दबाव आणला, असे आरोप झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि फलटण येथील जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या पोलिसांना हाताशी धरून येथील लोकांवर अन्याय करत आहेत, असे आरोप केले. जयश्री आगवणे यांनी तर त्यांचे पती दिगंबर आगवणे यांना निंबाळकर यांनीच खोट्या केसमध्ये अडकवले असा आरोप केला. या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या नेते माजी नगरसेवक अनुप शहा यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
दोघांना फलटणमधूनच रसद
सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांना फलटण येथून रसद पुरवली जात आहे. मेहबूब शेख हे काही दिवसांपूर्वी फलटण येथे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना भेटले होते त्यांना तिथे रसद मिळाली. जयश्री आगवणे या काही दिवसापूर्वी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर गेल्या होत्या, याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
बहिणीचा भावावर गंभीर आरोप, आगवणे कुटुंबात आरोप प्रत्यारोप
यावेळी सुनीता आगवणे म्हणाल्या की, माझा चुकत भाऊ दिगंबर आगवणे आणि जयश्री आगवणे यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. हे माझे वडील जनार्दन आगवणे यांना समजले असता, ते यामध्ये अडथळा ठरत होते म्हणून त्या दोघांनी माझ्या वडिलांची आणि भाऊ संतोष आगवणे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आत्महत्या म्हणून दाखवली. मी व माझ्या आईने त्यावेळी खूप संघर्ष केला. परंतु मला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनाही या संदर्भात पत्र पाठवले होते. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, असे त्यांनी म्हटले आहे.
