बिद्रे हत्याकांडाच्या तपासात याच तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरुंदकर याला मदत केली होती. आम्ही त्यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांना पुढे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. आताही तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखालीच फलटण युवती डॉक्टरच्या मृत्यूचा तपास होणार असल्याने तिला न्याय मिळेल असे वाटत नाही, असे राजू गोरे म्हणाले.
advertisement
...याच तुषार दोशी यांनी त्यावेळी खो घातला होता!
अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबत सुषमा अंधारे यांनी जे खुलासे केले, त्या अनुषंगाने जी वक्तव्ये केली ती अगदी बरोबर आहेत. अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये तुषार दोशी यांनी आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी तपासाची जबाबदारी क्राइम डीसीपी म्हणून तुषार दोशी यांच्याकडेच होती. पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी एका आरोपीची माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयारी केली असताना याच तुषार दोशी यांनी त्यावेळी खो घातला. या सगळ्या तक्रारी मी मुख्यमंत्र्यांकडे केल्या परंतु त्याचा काही फायदा झाला नाही, उलट पुढे जाऊन दोशी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले, असे राजू गोरे म्हणाले.
...तर युवती डॉक्टरला न्याय मिळेल असे वाटत नाही-राजू गोरे
त्याचमुळे डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी किंबहुना सातारा जिल्ह्याची जबाबदारी जर दोशी यांच्याकडेच राहिली तर भगिनीला न्याय मिळेल असे वाटत नाही, असे उद्विग्नपणे राजू गोरे म्हणाले.
अश्विनी आणि कुरुंदकरच्या मेसेजच्या तफावतीमुळेच गुन्ह्याची उकल होऊ शकली. हे मेसेज सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाहीत. कुरुंदकर हाच आरोपी आहे, त्यानेच अश्विनीचे बरे वाईट केले, या अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्या अनुषंगाने पुढचा तपास झाला, असे राजू गोरे यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, राजू गोरे यांच्या आरोपांवर न्यूज १८ लोकमतने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
