साताऱ्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने चिठ्ठीत केला. आत्महत्येपूर्वी बदने याचे नाव तिने तळहातावर लिहिले. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला होता. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे कायद्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर सामान्य लोकांनी कुणाकडे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने बदने याला थेट पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचे निर्देश फुलारी यांनी दिले.
advertisement
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आदेशात काय म्हटले आहे?
फलटण युवती डॉक्टर अत्याचार प्रकरणातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने, पोलीस उपनिरीक्षक (निलंबीत) याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुवर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात आणि दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.
त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक आणि लोकहिताचे दृष्टीकोनातून उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने (फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, सातारा) यास सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४/११/२०२५ रोजीपासून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
