पोलिसांनी दिली आतापर्यंतच्या तपासाची माहिती
साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याप्रकरणी आतापर्यंतच्या तपासाबद्दल माहिती दिली.
महिला डॉक्टरच्या आत्महत्या आणि छळाच्या प्रकरणात घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपींला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला देखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे, असे साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
advertisement
आमच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. संबंधित डॉक्टर युवतीने फलटण ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. तंदुरुस्ती प्रमाणपत्राबाबत (फिटनेस सर्टिफिकेट) या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलिस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पीएच्या मोबाईलवरुन माजी खासदाराने संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा उल्लेख मृत महिला डॉक्टरने पत्रात केला होता. यावरून माजी खासदार निंबाळकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, खासदारांचा उल्लेख हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. खासदारांचे नाव हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पत्रात आहे. सध्याच्या गुन्ह्यांशी याचा कोणताही संबंध दिसत नाही, असे सांगत दोशी यांनी निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे क्लिनचिट दिली.