अशी एकूण स्थिती असताना भाजपमधील इनकमिंग थांबलं नाही. अजूनही राज्यभरात विविध ठिकाणी पक्षप्रवेश सुरू आहे. नवीन लोकांना पक्षात डायरेक्ट एन्ट्री दिल्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली आहे. आयुष्यभर ज्यांचा विरोध केला, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आली आहे. यावेळी भाजपचे मूळ नेते दुसऱ्या पक्षात जाणं पसंत करत आहेत. याचाच फटका भाजपला कल्याणच्या टिटवाळा इथे देखील बसला आहे.
advertisement
टिटवाळ्यातील प्रदीप भोईर (कल्याण जिल्हा सचिव), तसेच सुरेश भोईर (माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रदीप भोईर आणि त्यांचं कुटुंब मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून भाजपशी एकनिष्ठ राहिलं आहे. पण पक्षात दिल्या जाणाऱ्या 'डायरेक्ट एन्ट्री', जुन्या कार्यकर्त्यांना न मिळणारा मान, आणि स्थानिक राजकीय समीकरणांकडे दुर्लक्ष, या कारणांमुळे त्यांनी मोठा निर्णय घेत ठाकरे गटात प्रवेश केला.
या वेळी शिवसेनेचे उपनेते विजय बंड्या साळवी, शहरप्रमुख बाळा परब, उपशहरप्रमुख किशोर शुक्ला यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष सोडताना त्रास होतो, अशा शब्दात प्रदीप भोईर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . "गेली ५० वर्षांहून अधिक काळ माझ्या वडिलांसह आम्ही भाजपशीच एकनिष्ठ राहिलो" असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
