पालघर: अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं असतानाच पालघरमध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैसे मिळाले असून यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पण, या प्रकरणावर जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही रक्कम मागील वर्षीची असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर येथील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर ११ एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून केवळ २ रुपये ३० पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री फसल योजनेतून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसला.
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते. अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना व्यक्त करत मधुकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
जिल्हा प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, पालघरमधील वाडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आलेल्या २ रुपये ३० पैशांच्या मदतीवर आता जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. मधुकर पाटील यांना मिळालेली दोन रुपये तीस पैसे मदत ही चालू वर्षाची नसून मागील वर्षीची शिल्लक रक्कम असल्याच स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. 2022 - 23 च्या नुकसानीची मदत मधुकर पाटील यांना मागील वर्षी 72,466 रुपये मंजूर करण्यात आली यापैकी ७२,४६४ रुपये मधुकर पाटील यांना 11- 5 -2024 रोजी म्हणजेच मागील वर्षी देण्यात आले होते.
मात्र, त्यापैकी २ रुपये ३० पैसे रक्कम ही काही तांत्रिक बाबींमुळे अडली असून ही रक्कम मागील तीन दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यात तब्बल वर्ष भरानंतर जमा झाली असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा कृषी अधीक्षकांकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, ही तांत्रिक चूक असून यावर्षी त्यांना अजून पर्यंत तरी कोणतीही शासनाकडून मदत मिळाली नसल्याचं देखील यावेळी कृषी अधीक्षक निलेश भागेश्वर म्हणाले.
