प्रमाणपत्र तपासणीस नकार का?
महाविद्यालयाने प्रमाणपत्र तपासणीस नकार देण्याचे कारण 'प्रेमची जात' असल्याचे आहे. नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेमला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी (verification) महाविद्यालयाने 'जात' विचारली. विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता, महाविद्यालयाने नकार दिल्याचे आंबेडकर म्हणाले.
advertisement
पुण्यातील कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप
मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे आहेत. त्या भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या राजकीय आणि वैचारिक संबंधावर बोट ठेवत, त्यांच्या कृतींना जातीय पूर्वग्रहाने आकार दिला असण्याची शक्यता वर्तवली आहे. मनुवादी भाजपशी त्यांचा (प्राचार्यांचा) राजकीय आणि वैचारिक संबंध पाहता, त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांविरुद्ध जातीय पूर्वग्रहाने त्यांच्याशी कसे वर्तन केले असेल याची आपण कल्पना करू शकतो, असे आंबेडकर म्हणाले.
प्रेम बिऱ्हाडेचे हे प्रकरण जातीय भेदभावाचे दुष्टचक्र कसे अजूनही दलित तरुणांना त्रास देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका होतकरू तरुणाला केवळ त्याच्या 'जाती'मुळे नोकरी गमवावी लागली आहे. प्रेमची ही कथा केवळ त्याची एकट्याची नसून, जातीय भेदभावामुळे ज्यांच्या महत्त्वाकांक्षा चिरडल्या जातात, अशा असंख्य दलित विद्यार्थ्यांची कथा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.