महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवानिमित्त मंदिर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची बैठक घेतली. अंबाबाई मंदिर आवारातील व बाह्य परिसरातील दुकानांमध्ये कालबाह्य झालेले लाडू आणि पेढ्यासारखे प्रसादाचे पदार्थ ठेवू नयेत, या पदार्थांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाईल, अशा सूचना नाईकवाडे यांनी दिल्या. जोतिबा यात्रेवेळी डोंगरावर कालबाह्य झालेला प्रसाद आढळला होता. त्यामुळे अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.
advertisement
अनेकदा मंदिराच्या आवारातील दुकानदार भाविकांनी ओटीचं अर्धवट साहित्य देतात. भाविकांनी याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत. याबाबत देखील शिवराज नाईकवाडे यांनी दुकानदारांना सुचना दिल्या. "भाविकांनी खरेदी केलेल्या साड्या, ओटी पूर्ण असाव्यात, साड्या अर्ध्या कापून त्यात पेपर भरलेल्या नसाव्यात, प्लॅस्टिक पिशव्या वापरू नयेत. याबाबत भाविकांकडून तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी," असं नाईकवाडे म्हणाले.
अंबाबाई मंदिराच्या आवारात सुमारे 35 दुकानं आहेत. दुकानदारांनी ओवरीच्या बाहेर 5 फूट अतिक्रमण केले आहे. ते हटवावे, भाविकांना आवारात ये-जा करताना अडथळा होऊ नये, याची काळजी घ्यावी, असंही सांगण्यात आलं. याशिवाय, देवस्थान समितीचे कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षकांची बैठक घेऊन त्यांना भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांनी दर्शन व्यवस्थेबद्दल भाविकांना माहिती द्यावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क रहावे, असं सांगण्यात आलं.