लोहगाव विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा पर्दाफाश झाला आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) धडक कारवाई करत तब्बल ८.७१ कोटी रुपयांचे 'हाय-एंड हायड्रोपोनिक वीड' जप्त केले आहे. विशेष म्हणजे हे ड्रग्ज साध्यासुध्या पाकिटात नाही, तर चक्क चॉकलेटच्या बॉक्समध्ये लपवून आणले गेले होते. याप्रकरणी पाच तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
advertisement
बँकॉक कनेक्शन आणि चॉकलेटचा सापळा
बँकॉकवरून इंडिगो विमानाने पुण्यात उतरलेल्या चार प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या हॅण्डबॅगमध्ये चॉकलेटचे मोठे बॉक्स होते. जेव्हा हे बॉक्स उघडले, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले. १६ एअरटाईट सीलबंद पाकिटांमध्ये ८ किलोहून अधिक ड्रग्ज लपवले होते. हे सर्व तरुण २१ ते ३० वयोगटातील असून त्यातील चार जण झारखंडचे आहेत, तर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आलेला पाचवा तरुण रत्नागिरीचा आहे.
नोकरीचं आमिष दाखवून 'कुरिअर' बनवलं
अटक करण्यात आलेल्या तरुणांनी दिलेली माहिती थक्क करणारी आहे. "आम्हाला बँकॉकला नोकरीच्या बहाण्याने बोलावले होते. तिथे गेल्यावर काम मिळाले नाही, पण परत येताना आम्हाला चॉकलेटचे बॉक्स देण्यात आले," असा दावा या तरुणांनी केला आहे. मात्र, हा ड्रग्ज सिंडिकेटचा एक भाग असून तरुणांना कुरिअर म्हणून वापरले जात असल्याचा दाट संशय कस्टम विभागाला आहे.
पुणे विमानतळ बनतंय तस्करीचा अड्डा?
गेल्या काही महिन्यांतील पुणे विमानतळावरील ही तिसरी मोठी कारवाई आहे. पुणे विमानतळावर ११ फेब्रुवारी रोजी ५.४ कोटींचे ड्रग्ज खेळण्यांच्या बॉक्समध्ये सापडले होते. तर, ३ मार्च विमानातील स्वच्छतागृहात (Lavatory) ७४.५ लाखांचे ड्रग्ज सापडले होते. ७ मार्च रोजी आता ९ कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या सलग कारवायांमुळे पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीची मोठी साखळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत असून कस्टम विभागाने आता बंदोबस्त अधिक कडक केला आहे.
