पुण्यातील भडकलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'बोल भिडू'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज्यात चर्चेत असलेले आंदेकर कोमकर यांच्यातील टोळीयुद्ध, आंदेकर टोळीची मोडस ऑपरेंडी, गेल्या वर्षी पुण्यात घडलेले पोर्शे प्रकरण, पुण्यातील नाईट लाईफ, नव तरुणांना गुन्हेगारी वर्तुळाबद्दल वाढलेले आकर्षण अशा विविध मुद्द्यांवर अमितेश कुमार यांनी उत्तरे दिली.
advertisement
गँगमधील सदस्यांच्या आर्थिक नाड्या आवळणार
अमितेश कुमार म्हणाले, आंदेकर टोळीने शाळकरी मुलगा आयुषचा खून अत्यंत चुकीचे पाऊल उचलले. या टोळीला आम्ही सोडणार नाही. त्यांना तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही. आंदेकर टोळीचे सगळे आर्थिक स्त्रोत बंद करून टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यादृष्टीने आम्ही कारवाया देखील सुरू केल्या आहेत. त्यांच्या घरासमोर अवैध पद्धतीने मच्छी मार्केट लावून पैसे उकळण्याचे काम सुरू होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर आम्ही अत्यंत आक्रमक पद्धतीने कारवाई करून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे काम केले. आंदेकर टोळीतल्या सगळ्या सदस्यांचे बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांचे बँकेतील लॉकर्स सील करण्यात आलेली आहेत.
५ वर्षात तब्बल ९ प्रॉपर्टी विकत घेतल्या
तसेच आजच सकाळी मिळालेल्या माहितीनुसार एका सदस्याने गेल्या पाच वर्षात सुमारे आठ-नऊ वेळा निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी खत केली आहेत. प्रोसिड्स ऑफ क्राईमच्या माध्यमतातून अनधिकृत माध्यमातून जमवलेली सगळी संपत्ती जप्त करण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न असेल. टोळीतील सदस्यांचे फार्महाऊस, इमारती, भागिदारीमधील कंपन्या यावर धाड मारणे सुरू आहे. अनधिकृत म्हणून जे जे हाताला लागेल, त्यावर कारवाई करून टोळीवर जरब बसविण्याचे काम आम्ही करू. टोळीची आर्थिक नाकेबंदी करून त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनाही शोधून काढू. ही कारवाई करताना महिला पुरुष असा भेदभाव न करता कुणाचाही मुलाहिजा आम्ही बाळगणार नाही. महिला असो की पुरूष सगळ्यांना आम्ही आरोपी करू, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.