अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांनी पुण्याची निवडणूक विशेष गाजली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. पण अजित पवार यांच्या प्रचार सभांनी पुण्यात रंगत आणली. पक्षात मरगळ आल्याचे ओळखून पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. भाजपला थेटपणे अंगावर घेतले. भाजपने विकासच केला नाही, असा थेटपणे आरोप करून ही नुराकुस्ती नाही, असे थेटपणे दाखवून दिले. त्याचा सकारात्मक परिणाम तूर्त झालेला दिसतो, पण राष्ट्रवादीची गाडी सत्ता स्थापनेपर्यंतचा प्रवास करणार नाही, असे टीव्ही ९-PRAB केलेला सर्व्हे सांगतो.
advertisement
पुण्यात कोणत्या पक्षाला किती जागा?
पुण्यात भारतीय जनता पक्षाला ९३ जागा, शिवसेना एकनाथ शिंदे यांना ०६ जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४३ जागा, शिवसेना ठाकरे गटाला ०७ जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ०८ जागा तर इतरांना दोन ते पाच जागा मिळतील, असा टीव्ही ९-PRAB सर्व्हेचा अंदाज आहे.
एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे सेनेला केवळ एक अंकी जागा मिळणार?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी लढून त्यांना अजिबातच फायदा झालेला नाही. केवळ एक अंकी संख्येत शिंदेसेनेला समाधान मानावे लागेल, असे दिसते. दुसरीकडे सेना-मनसे एकत्र येऊनही ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळणार नसल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर येते.
पुण्यात किती टक्के मतदान?
पुण्यातील ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी गुरूवारी मतदान संपन्न झाले. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत केवळ ३६ टक्के मतदान झाले. मतदानाचा म्हणावा असा प्रतिसाद लाभलेला नाही. पुणेकर उस्फूर्तपणे मतदानासाठी घराबाहेर पडले नसल्याचे चित्र राहिले.
